नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहर व परिसरात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिकेला प्राप्त माहितीनुसार, गेल्या आठवडाभरातच डेंग्यूचे तब्बल ९६ नवे रुग्ण आढळले आहेत.
पालिकेच्या मलेरिया विभाग अलर्ट मोडवर आला असून डेंग्यू निर्मूलनासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. डेंग्यू जनजागरण मोहिमेंतर्गत पालिकेच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालयासह धार्मिक स्थळांवर धर्मगुरूंच्या मदतीने मंदिरे, मशिदीत जनजागृती केली जाणार आहे.
पालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्याने आदिवासी विकास आयुक्तालय तसेच शासकीय मुलींचे आयटीआय या संस्थांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव सध्या डोकेदुखी ठरला आहे.
मे महिन्यात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले होते. डास निर्मूलन मोहीम प्रभावीपणे न राबविली गेल्याने डासांची उत्पत्ती रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याने जून महिन्यात आजाराचा प्रादुर्भाव अधिकच वाढला. जून मध्ये डेंग्यू बाधितांचा आकडा १५५ वर गेला. पावसाळा सुरू झाल्यानंतर या आजाराचा शहरात अक्षरशः उद्रेक झाल्याचे चित्र आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच डेंग्यूचे ३०८ संशयित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांचे रक्तनमुने प्रयोगशाळेत तपासले असता यातील ९६ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले.