नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक: पावसाळा सुरू होताच शहरात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, रुग्णसंख्येचा आकडा दुसऱ्या आठवड्यात १०४ पर्यंत पोहोचल्याने आता एकूण रुग्णसंख्या २०० वर पोहोचली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या ९६ होती. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत महापालिकेने डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागरण मोहीम हाती घेतली आहे.
या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घर आणि परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहरात जुलै महिन्यातच डेंग्यूची सुरूवात झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.
एडीस डासांची उत्पत्ती सात दिवसांपेक्षा जास्त काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याच्या टाक्या, बॅरल, हौद, रांजण, ओव्हरहेड टँक आदी आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करून घासूनपुसून कोरडे करावेत. फ्रीजमागील ट्रे, कुलर, फिशटँक, एसी, डक्ट, लिफ्ट यामध्ये पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. फुलदाणी, चायनीज बांबू, मनी प्लांट आदी शोभिवंत झाडांमधील पाणी दिवसाआड बदलावे तसेच कुंडीखाली असलेल्या प्लेटमधील पाणी काढून कोरडे करावे.