नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): डिसेंबरच्या दोन आठवड्यात शहरात नव्याने डेंग्यूचे दीडशे रुग्ण आढळून आले आहे. बाधित त्यांची संख्या एकूण ११३५ झाली आहे.
त्या व्यतिरिक्त डेंग्यूने तीन बळी गेले असून, वैद्यकीय विभागाचा डेंग्यूची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा फोल ठरला आहे.
मुख्यत्वे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पावसाळा संपल्यानंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव जाणवतो. यंदा डिसेंबरमध्येदेखील डेंग्यूने कहर कायम ठेवला आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे ४७ रुग्ण होते. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. सप्टेंबर महिन्यात २६१ रुग्ण आढळून आले, तर ऑक्टोबर महिन्यात १९३ बाधित आढळले.
नोव्हेंबर महिन्यात पावणेतीनशे नागरिकांना डेंग्यूची बाधा झाली. डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात दीडशे नवीन बाधित रुग्ण आढळले आहे.
एकूण डेंग्यू बाधितांची संख्या ११३५ वर गेली आहे. ऑक्टोबर महिन्यात नाशिक रोड विभागातील आनंदनगर परिसरातील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला.
त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात सिडकोतील डीजीपीनगर कामटवाडे भागातील, तर पंचवटीच्या म्हसरूळ विभागातील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत डेंग्यूने तिघांचा बळी घेतला आहे.