नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शेअर्स मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष देत २४ लाख ६६ हजारांचा गंडा घातल्या प्रकरणी शेअर्स ट्रेडींग कंपनीच्या प्रतिनिधींच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि विवेक सौंदाणे (रा. ओमनगर, मखमलाबाद रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२३ ते २० एप्रिल २०२४ या कालावधीत इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग करून भरघोस नफा कमावण्याचे आमिष दाखवले.
विविध कंपन्यांच्या शेअर्सची नावे सांगत यात गुंतवणूक केल्यास शेअर्सची किंमत कशी वाढली याची माहिती दिली. सौंदाणे यांना विश्वास बसल्याने त्यांनी विविध शेअर्समध्ये २४ लाख रुपयांची गुंतवणूक केली. संशयितांनी दोन महिन्यात नफा मिळवून देतो, असे सांगितले होते.
पाच महिने उलटूनही नफा मिळत नसल्याने सौंदाणे यांनी संशयित जान्हवी भोसले, कुणाल अग्निहोत्री या प्रतिनिधींशी संपर्क साधला. संशयिताने पैसे शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार केली.