नाशिक (प्रतिनिधी): शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा कमविण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील व्यावसायिकासह नोकरदारांची तब्बल ४० लाखांना गंडा घातला आहेत. शहर सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश अशोक मेखा (४५, रा. ग्रीन कोर्ट अपार्टमेंट, कर्मयोगी नगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, सायबर भामट्यांनी ग्रो कॅपिटल ग्रुपच्या नावाने २८ मे ते २ ऑगस्ट यादरम्यान शिवांश सिंग व अन्य संशयितांनी जेएम ज्वाँईंट प्राॅफिट प्लॅन समजावून सांगितला. यात गुंतवणूक केल्यास जादा आर्थिक लाभ मिळण्याचे अमिष दाखविले. तसेच, संशयितांना त्यांना बनावट व्हाटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करीत गुंतवणूक केलेल्यांना कसा फायदा होतो आहे, हे त्या ग्रुपमधील व्हिडीओतून दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.
या अमिषाला भुलून मेखा यांनी २८ लाख ४२ हजार रुपये गुंतविले. मात्र, अनेक दिवस उलटूनही पैशांचा परतावा मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पाेलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
अन्य दोघांनाही घातला गंडा:
मेखा यांच्याप्रमाणेच, सायबर भामट्यांनी प्रमोद साहेबराव पाटील यांना ७ लाख १९ हजार रुपये, आणि निखील घयासी यांना ४ लाख ८६ हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडून त्यांनाही गंडा घातला. अशारितीने संशयित भामट्यांनी तिघांना ४० लाख ४७ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.