नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मनी लॉण्डरिंगच्या प्रकरणात सहभागी असल्याचे सांगून त्या प्रकरणात अटक करण्याचा धाक दाखवून एका महिलेला सायबर भामट्यांनी २३ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना शहरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की ५९ वर्षीय फिर्यादी महिला ही द्वारका परिसरात राहते. या महिलेला दि. १३ सप्टेंबर रोजी ९११२०४४४२०४९ या मोबाईल क्रमांकावरून, तसेच ९१७६०६९६३७१२ या क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपधारकाने त्यांच्याशी संवाद सुरू केला. त्यानंतर व्हिडिओ कॉल करून महिलेशी संपर्क साधला. त्यावेळी पलीकडून बोलणाऱ्या व चॅटिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी आम्ही दिल्ली पोलीस, सीबीआय व ट्रायमधून बोलत आहोत, असे सांगितले.
त्यानंतर अज्ञात आरोपींनी फिर्यादी महिलेला फोनवरून सांगितले, की संदीपकुमार मनी लॉण्डरिंग केसमध्ये तुमचा सहभाग असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे या केसमध्ये तुम्हाला अटक करावी लागेल, असा धाक दाखविला, तसेच फिर्यादी महिलेला वेगवेगळ्या प्रकारे अटक करण्याचा धाक दाखवून मनी लॉण्डरिंग केसच्या तपासाच्या नावाखाली व अटक करण्याचा बहाणा केला.
त्यानंतर ही अटक टाळण्यासाठी आरोपींनी फिर्यादी महिलेला तिच्या अॅक्सिस बँक खात्यावरून आयसीआयसीआय या बँकेच्या खात्यावर एकूण २३ लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. पीडित महिलेने ही रक्कम आरोपींच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर आरोपींच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो संपर्क होऊ शकला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाणे गाठून ऑनलाईन फसवणुकीची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.