नाशिक (प्रतिनिधी): सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसतेय. कधी वर्क फ्रॉम होम तर कधी ट्रेडिंग.. सामान्य नागरिक मोठ्या रकमेच्या आमिषांना बळी पडतांना दिसत आहे.
स्टॉक ट्रेडिंग आयपीओ अलॉटमेंटमधून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी एका तरुणाला साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हा ३५ वर्षीय तरुण असून, तो सिडकोत राहतो. त्यांना एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फोन आला. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज् १६ या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून काही व्यक्तींनी चॅटिंग केली. त्यादरम्यान आरोपींनी एसएमसी या ब्रोकर कंपनीचे नाव वापरून एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज नावाच्या मोबाईल अॅपमधून अपर सर्किट, लोअर सर्किट, स्टॉक ट्रेडिंग, आयपीओ अलॉटमेंटमधून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याकरिता वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ७ लाख ५६ हजार ७०९ रुपये ट्रान्स्फर करण्यास लावले; मात्र बरेच दिवस उलटूनही नफा न मिळाल्याने पैसे परत मागितले असता ते परत न केल्याने आपली आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आले.
हा प्रकार दि. २९ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.