नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील एकास अल्पदराचे आमिष दाखवून भामट्यांनी तब्बल दहा लाखास गंडा घातला आहे. ऑनलाईन सिमेंट आणि स्टिल खरेदीत ही फसवणूक झाली आहे. मालाचा पुरवठा न झाल्याने याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव कार्तिबन तेवर (रा. अश्विनीनगर, सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तेवर यांना घराचे बांधकाम करायचे असल्याने ते गेल्या डिसेंबर महिन्यात सिमेंट आणि पोलाद स्टीलच्या बाजार भावाचा शोध इंटरनेटच्या माध्यमातून घेत असतांना भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. संपर्क साधणाऱ्या भामट्यांनी थेट कंपनी आऊटलेटच्या माध्यमातून अल्पदरात सिमेंट आणि स्टीलची घरपोहच डिलेव्हरी देण्याची ग्वाही दिल्याने तेवर यांचा विश्वास बसला.
बाजारभावापेक्षा अल्पदरात सिमेंट आणि स्टील मिळणार असल्याने तेवर यांनी मालाची ऑर्डर दिली. यापोटी सुमारे दहा लाख १५ हजाराची रक्कम भामट्यांनी कळविलेल्या बँक खात्यात जमा केली असता ही फसवणुक झाली. बँक, वॉलेट खाते व विविध मोबाईल धारकांच्या माध्यमातून त्यांनी लाखोंच्या रकमा भरल्या. मात्र तीन महिने उलटूनही मालाचा पुरवठा न झाल्याने त्यांनी सदर मोबाईल धारकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे तेवर यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.