नाशिक (प्रतिनिधी): शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास, जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तिघांना एकूण २४ लाखांचा गंडा घातला आहे. पैसे गुंतविल्याची रक्कम व मिळणारा परतावाही बँक खात्यात क्रेडिट न झाल्याने तिन्ही गुंतवणूकदारांची फसवणूक झालीआहे. या फसवणूकीप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील उच्चशिक्षित महिलेसह दोघा तरुणांना सायबर चोरट्यांनी नोव्हेंबर २०२४ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकांवरुन संपर्क साधून शेअर मार्केटींग, फॉरेक्स ट्रेंन्डिंग व अन्य बाबींमध्ये पैसे गुंतविल्यास कमी कालावधीत जास्तीचा आर्थिक परतावा मिळेल, तसेच गुंतवलेली रक्कमही सुरक्षित राहून कालांतराने ‘वनटाईम’ परत मिळेल, असे आमिष दाखविले.
कमी रकमेच्या गुंतवणुकीवरही जास्तीता व इंन्स्टंट परतावा मिळेल, या अपेक्षेने महिलेसह दोघांनी वेगवेगळ्या ट्रेन्डसमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरविले. विशेष म्हणजे, सायबर चोरट्यांनी या तिघाही गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी आदित्य बिर्ला कम्युनिकेशन इन्स्टिट्यूट व आदित्य बिर्ला व्हीआयपी ग्रुपच्या नामसाधर्म्याचा वापर करुन आकर्षित केले. तसेच, इतर गुंतवणूक दारांना कोणत्या गुंतवणूक रकमेवर किती दिवसांत कितीचा परतावा मिळाला, याबाबतची लाईव्ह चॅटिंग, व्हिडीओज दाखविले. विश्वास बसल्याने महिलेसह अन्य दोघांनी गुंतवणूक केली.
त्यानुसार, पहिल्या तक्रारदाराने संशयितांनी दिलेल्या विविध बँक खात्यांवर सात लाख सात हजार रुपये, तर दुसऱ्या तक्रारदाराने सात लाख रुपये व महिलेने दहा लाख रुपये अशी एकूण २४ लाख ७ हजार रुपये वर्ग केले. मात्र, अनेक दिवसांचा कालावधी लोटूनही गुंतविलेली रक्कम व परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. त्यांनी संशयितांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे कळल्यावर तिघांनी सायबर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करत आहेत.