नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करीत सेवानिवृत्त बँक अधिका-यास तब्बल ४५ लाखाचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. मनी लॉन्डरिंगमध्ये सहभाग असल्याची धमकी देत सायबर भामट्यांनी ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिगंबर शालीग्राम (६१ रा.कॉलेजरोड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. शालीग्राम हे सेवानिवृत्त बँक अधिकार असून सायबर भामट्यांनी त्यांच्याशी ७ ते १३ मार्च दरम्यान संपर्क साधला होता. मुंबई पोलीस तसेच सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करण्यात येवून शालीग्राम यांना तुम्ही मनी लॉन्डरिंगमध्ये सहभागी असल्याचे सांगण्यात आले होते.
९६२११७५८४३ व स्काईप आयडीवरील संपर्क साधत त्यांना केसमध्ये अटक करण्याची धमकी देण्यात आली होती. ही अटक टाळण्यासाठी विविध बँक खात्यावर त्यांना रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले असून ४५ लाख १० हजाराची रक्कम भरूनही भामट्यांचा ससेमिरा सुरूच राहिल्याने शालीग्राम यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.