नाशिक (प्रतिनिधी): सायबर भामट्यांकडून आर्थिक फसवणुकीचे आकडे आता कोटींमध्ये पोचत आहेत. दीड कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा बुधवारी (ता. २१) दाखल झाला. यानंतर सीबीआय आणि ईडीच्या नावाने धमकावत व थेट सर्वोच्च न्यायालय आणि ईडीच्या बनावट नोटीस पाठवत सव्वाचार कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआयमधून बोलत असल्याची बतावणी करताना सुटकेसाठी शहरातील तिघांना तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता.
याप्रकरणी युवकांनी सायबर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २१) तक्रार दाखल केली होती. त्यापाठोपाठ गुरुवारी (ता. २२) सव्वाचार कोटींच्या फसवणुकीचा आणखी एक गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सायबर भामट्यांनी संगनमत करून फिर्यादीदारांना सीबीआय आणि ईडीची धमकी देत पैसे उकळले. बँकेचे क्रेडिट कार्डद्वारे २ कोटी ५६ लाख रुपयांची फसवणूक केली. इतक्यावरच न थांबता भीती दाखवत आर्थिक फसवणूक सुरुच ठेवली. फसवणुकीचा आकडा सव्वा चार कोटींवर पोहोचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीदार यांना लक्षात आले.
फिर्यादीने पोलिस विभागाला विनंती केल्याने त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, फिर्यादीदार ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहे. आयआयटीतून शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत नोकरी करताना ते निवृत्त झाले आहेत. ते स्वतः ‘ग्रीन कार्ड’धारक असून, त्यांचा मुलगादेखील अमेरिकेत नोकरी करतो. दरम्यान १९ जून ते ६ जुलै या अठरा दिवसांच्या कालावधीत भामट्यांनी फिर्यादीदारांना चुना लावला. संपर्क साधण्यासाठी भामट्यांनी चार वेगवेगळ्या व्हॉट्सअप क्रमांकांचा वापर केला.
भामट्यांनी व्हॉट्सॲपच्या डीपीवर एलटी मार्ग पोलिस ठाण्याचा लोगो वापरला. फिर्यादीदारांच्या क्रेडिट कार्डद्वारे २ कोटी ५६ लाखांची फसवणूक केली. इतक्यावर न थांबता मनी लॉडरिंग व गुंतवणुकीतील फसवणुकीच्या प्रकरणात संशयित म्हणून नाव असल्याचे फिर्यादीदारांना भासविले. मुदत ठेवी (एफडी), म्युच्युअल फंडची सर्व माहिती उकळली. यानंतर फसवणूक प्रकरणात सीबीआय अधिकारी, ईडीमार्फत चौकशीसाठी मालमत्ता गोठवत असल्याचे भासविले. सर्वोच्च न्यायालय, ईडी यांच्या बनावट नोटीस पाठविली. या नोटिशीत बँक खात्याचा तपशील नमूद करताना, या खात्यांवर तब्बल एकूण ४ कोटी २५ लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडले.