नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाईन स्टॉक मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून ट्रेडिंगच्या बहाण्याने जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने पाच जणांची ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे दि. ९ मे रोजी घरी असताना त्यांना अज्ञात व्हॉट्सअॅपधारकाने संपर्क केला. त्यावरून त्यांची चॅटिंग सुरू झाली. चॅटिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी यांना ऑनलाईन स्टॉक मार्केट ब्रोकर असल्याचे भासविले. त्यानंतर ऑनलाईन स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
ग्रो इंटरनॅशनल नावाच्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून वेगवेगळे आयपीओ खरेदी करण्याच्या नावाखाली एकूण १४ लाख ९१ हजार ५२१ रुपयांची, तसेच वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप धारकांनी स्टॉक मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली साक्षीदार क्रमांक १ यांच्याकडून ६ लाख ३२ हजार रुपये, साक्षीदार क्रमांक २ यांच्याकडून २४ लाख १० हजार ८४१ रुपयांची, साक्षीदार क्रमांक ३ यांच्याकडून ११ लाख ७१ हजार रुपये, साक्षीदार क्रमांक ४ यांच्याकडून ३० लाख ६५ हजार १२७ रुपये, तर साक्षीदार क्रमांक ५ यांच्याकडून ५ लाख ६८ हजार रुपये असे एकूण ९३ लाख ३८ हजार ४८९ रुपये ऑनलाईन पद्धतीने मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे स्वीकारून त्यांची आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार दि. ९ मे ते २० ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.