नाशिक (प्रतिनिधी): शेअर्स खरेदी करीत असल्याचे आमिष दाखवून एका इसमास बँक खात्यांत सुमारे ६५ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक करणाऱ्या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की व्हॉट्सअॅप ग्रुपवर खोटे संदेश पाठविणाऱ्या शालिनी शर्मा नामक महिलेसह इतर सदस्यांनी अलायन्झ ग्लोबल ट्रेडिंग प्रो या कंपनीचे नाव वापरून बनावट इन्व्हेस्टमेंट अॅप तयार केले. त्या अॅपच्या आधारे फिर्यादीच्या नावाने वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करीत असल्याचे आमिष दाखविले. तसेच फिर्यादीस विविध बँक खात्यांमध्ये गुंतवणूक म्हणून प्रथम ५२ लाख २२ हजार २४७ रुपये अदा करण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवून ही रक्कम जमा केली.
त्यानंतर फिर्यादीने ही रक्कम बँकेच्या खात्यातून विथड्रॉल करण्याचा प्रयत्न केला; परंतु फिर्यादीला कॅपिटल गेन टॅक्स म्हणून पुन्हा १२ लाख ५४ हजार १४७ रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी या व्यवहारात एकूण ६४ लाख ७४ हजार ३८४ रुपयांची गुंतवणूक केली; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवूनही फायदा होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपवरील भामट्यांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.
![]()


