नाशिक | दि. १९ ऑगस्ट २०२५ : शहरातील तिघा नागरिकांची तब्बल ४१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने ही फसवणूक केली असून, याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकीता घोष असे संशयित महिलेचे नाव आहे. गेल्या महिन्यात तिने तक्रारदारासह अन्य दोघांशी संपर्क साधून त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. या ग्रुपमधून तिने शेअर मार्केट व गुंतवणुकीसंबंधी माहिती देत गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला.
यानंतर बनावट ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून, स्टॉक व आयपीओ खरेदीच्या नावाखाली विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास प्रवृत्त केले. अखेरीस या तिघांकडून तब्बल ४० लाख ४४ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.