नाशिक (प्रतिनिधी): घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन तरुणांनी घरात एकट्या असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोडला घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित महिला ही गंगापूर रोड परिसरात परिसरात राहते. काल (दि. ८) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास निखिल नावाचा तरुण व त्याच्यासोबत असलेला अन्य एक मित्र हे दोघे जण महिलेच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या बहाण्याने आले.
त्यांनी हातात असलेले कटर काढून फिर्यादी महिलेच्या कानाखाली लावले व तिला मिठी मारली. त्यानंतर निखिलसोबत असलेल्या त्याच्या मित्राने स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून पीडितेचा विनयभंग केला व ही बाब जर कोणाला सांगितलीस, तर आम्ही तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३००/२०२४)