नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीत सोळा वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने तब्बल सोळा वार करून त्याचा निघृण खून केल्याची घटना गुरुवारी (दि.३०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. आशिष दशरथ रणमाळे (रा.कर्णनगर, पेठ रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शरदचंद्र मार्केट यार्डच्या पाठीमागे असलेल्या कर्णनगर भागातील खंडेराव मंदिराजवळ असलेल्या उद्यानात ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. त्याचे पर्यवसन थेट खूनाच्या घटनेत झाले. हल्लेखोरांमध्ये काही विधी संघर्षित मुले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे.
रात्री आशिष हा अंगणवाडीच्या पायऱ्यांवर बसलेला होता. यावेळी तेथे त्याच्या ओळखीचे काही मुले आली. त्यांनी शस्त्राने आशिष याच्यावर वार केले. ही बाबा त्याच्या कुटुंबीयांना लक्षात येताच नागरिकांच्या मदतीने त्यांनी आशिषला जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून तिघेही विधिसंघर्षित आहेत.
आशिष हा रणमाळे कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा होता. तो केटीएचएम महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याचे वडील दशरथ रणमाळे है मोल मजुरीची कामे करतात. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.