नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कर्जाचा हप्ता भरण्यासाठी खासगी फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नीता श्रावण गुरनुले (वय 41, रा. म्हाडा कॉलनी, गोदावरीनगर, सातपूर) यांचे पती श्रावण दसरूजी गुरनुले (वय 50) यांनी खासगी फायनान्सकडून कर्ज घेतले होते.
त्यांनी सुरुवातीला कर्जाचे हप्ते सुरळीत भरले; मात्र मार्च महिन्याचा हप्ता भरला न गेल्याने आरोपी खासगी फायनान्स बँक व त्यांचा कर्मचारी संशयित प्रशांत बोरसे यांनी गुरनुले यांना वारंवार फोन करून हप्ता भरण्यासाठी तगादा लावला, तसेच फोनद्वारे दमदाटी व शिवीगाळ करून “तुम्ही मरा किंवा काहीही करा; परंतु बँकेचा हप्ता भरा,” असे बोलून वसुली कर्मचारी प्रशांत बोरसे याने गुरनुले यांना वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले.
या त्रासाला कंटाळून श्रावण गुरनुले यांनी दि. 26 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास डीजीपीनगर क्रमांक 2 येथील सुवास्तू अपार्टमेंटमधील वॉचमन केबिनमध्ये आत्महत्या केली.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खासगी फायनान्स व कर्मचारी प्रशांत बोरसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २८९/२०२४)