नाशिक (प्रतिनिधी): आचारसंहिता काळात गुन्हेगारी नियंत्रणासाठी शहर आयुक्तालयातील परिमंडळ २ मधील ७ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या कारवाईत रेकॉर्डवरील १५८ गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तडीपार गुन्हेगाराकडे गावठी कट्टा, अंबडमध्ये तलवार आणि नाशिकरोडमध्ये अवैध मद्यसाठा मिळून आला.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, अंबड, इंदिरानगर, सातपूर आणि चुंचाळे पोलिस चौकी या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. उपनगर पोलिसांनी तडीपार केलेला सराईत गुन्हेगार विकी शिराळ याच्या घरी गावठी कट्टा मिळून आला. सुशील कांबळे याच्याकडे कोयता, तडीपार गणेश कुऱ्हाडे याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत महेश पकडे याच्याकडून अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.