नाशिक (प्रतिनिधी): कपडे धुण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून जन्मदात्याने स्वतःच्याच मुलीला शिवीगाळ व अंगलट करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित मुलगी ही अल्पवयीन असून, आरोपी हे तिचे वडील आहेत. पीडिता मुलगी ही काल (दि. २५) महाविद्यालयास सुटी असल्यामुळे घरी होती. ती कपडे धुवत होती. त्यावेळी तिचे वडील दारू पिऊन घरी आले. त्यांनी पीडितेला कपडे धुण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून प्रथम शिवीगाळ व मारहाण केली.
पीडितेने प्रतिकार केला असता त्यांनी तिच्याशी अंगलट करून तिला मिठी मारली व शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. असे केले नाही, तर तुला जिवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर भेदरलेल्या मुलीने कंपनीत कामाला गेलेल्या आईला फोन करून घरी बोलावून घेत झालेला प्रकार कथन केला.
त्यानंतर पीडितेने तिच्या आईसह अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत जन्मदात्याविरुद्ध विनयभंगाची फिर्याद दिली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.