नाशिक (प्रतिनिधी): फूड डिलिव्हरी करण्यासाठी गेलेल्या डिलेव्हरी बॉयला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
बिर्याणीची ऑर्डर पोहचविण्यासाठी गेलेल्या डिलेव्हरी बॉयला टोळक्याने बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना पेठरोड येथील अश्वमेधनगर भागात घडली. या घटनेत धारदार शस्त्राने मारहाण करीत भामट्यांनी मोबाईल हिसकावून पाच हजाराची रोकड ऑनलाईन लांबविली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित सागर जाधवव बाबा,आजू आणि दुर्गेश नामक साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत राज (२५ रा.चांदशी, आनंदवली) या युवकाने फिर्याद दिली आहे. राज डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो. शनिवारी (दि.१८) रात्री तो एका हॉटेलवरील ऑर्डर पोहोचविण्यासाठी दुचाकीवर अश्वमेधनगर येथील श्रीधर कॉलनीत गेला असता ही घटना घडली.
संशयित सागर जाधव याने मागविलेली लखनवी चिकन बिर्याणीची ऑर्डर घेवून राज शेळके रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दिलेल्या पत्यावर पोहचला होता. संशयितांनी ऑर्डर घेत त्यास शिवीगाळ करीत मारहाण केली.
या घटनेत संशयितांनी धारदार शस्त्र उलट्या बाजूने मारून त्या दुखापत केली. तसेच खिशातील ८०० रूपयांची रोकड बळजबरी काढून घेत तसेच जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल हिसकावून घेतला. राजच्या मोबाईलमधील फोन पे अॅपच्या माध्यमातून ५ हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. अधिक तपास दिपक पटारे करीत आहेत. (म्हसरूळ पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २०/२०२५)