नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पेठरोडवरील आरटीओ भागात तेल व्यापा-याची वाट अडवित दुचाकीस्वार त्रिकुटाने मारहाण करीत १७ लाख रूपये असलेली बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप दगडूराम छाजेड (रा. किशोर सुर्यवंशी मार्ग,म्हसरूळ) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. शरदचंद्र पवार मार्केटमधील तेलाचे व्यापारी दिलीप छाजेड हे बुधवारी (दि.१७) रात्री आपले दुकान वाढवून रात्री नऊच्या सुमारास घराकडे जात असतांना ही घटना घडली. आरटीओ कॉलनी परिसरातून जात असताना समोरून येणा-या दुचाकीवरील तिघांनी छाजेड यांच्या गाडीला आडवे होत जबरदस्तीने गाडी थांबवून त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळील बॅग हिसकावत पळ काढला.
या घटनेत संशयितांनी छाजेड यांच्या जवळील १६ लाख ९७ हजाराची रोकड लुटली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ९२/२०२४) अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करीत आहेत.