
नाशिक (प्रतिनिधी): चॉपरने केक कापत वाढदिवस साजरा करणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली. संशयिताचा केक कापतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पथकाने त्याचा मखमलाबाद येथील शांतीनगर येथे माग काढत त्याला अटक करत थेट पोलिस कोठडीत त्याचे सेलिब्रेशन केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शांतीनगर परिसरात एका इसमाने चॉपरने केक कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने संशयिताचा माग काढत त्याला मानकर मळा, परिसरात सापळा रचून अटक केली. चौकशीत त्याने गजानन गणेश शेळके (२० रा. जिंतूर, परभणी हल्ली, रा. मानकर मळा) असे नाव सांगितले. संशयिताकडून स्टीलचा चॉपर जप्त करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, चेतन श्रीवंत, रवींद्र आढाव, महेश साळुंके, विलास चारोस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.