नाशिक (प्रतिनिधी): बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून तीन जणांनी एका वृद्धाची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी राजेंद्र मुरलीधर ताडगे (वय ६०, रा. मखमलाबाद, ता. जि. नाशिक) यांचे नातेवाईक उगलमुगले (रा. नाग चौक, पंचवटी) यांनी ताडगे यांची संशयित सुनील कुमार भामरे (रा. राणेनगर, नाशिक) व सचिन खैरनार (रा. कामगारनगर, सातपूर) यांच्याशी ओळख करून दिली.
त्यानंतर संशयित भामरे व खैरनार यांनी पंचवटी कारंजा, राणेनगर व फिर्यादी ताडगे यांच्या घरी येऊन त्यांना बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ताडगे यांनी गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली. त्यानंतर आरोपींनी ताडगे यांच्याकडून एकूण ५ लाख २५ हजार रुपये चेकद्वारे घेतले; मात्र त्या बदल्यात कोणताही परतावा न देता फिर्यादीची मूळ रक्कम परत करण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली.
हा प्रकार सन २०२२ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मखमलाबाद येथे घडला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १८/२०२५)