नाशिक (प्रतिनिधी): उपनगर परिसरातील शेंगदाणे, फुटाणे विक्री करणाऱ्या महिलेस मारहाण करुन तिचा हातगाड्याची तोडफाड व पैशांची लुट करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अखेर शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. संशयितांनी हातात लाठ्या काठ्या घेऊन हातगाडी चालक महिलेसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक मारहाण केली होती.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. किरण रतन पाटील उर्फ गुजर (३५, रा. पंचशिलनगर, शिवाजी नगरमागे, उपनगर) असे मुसक्या आवळण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. गेल्या २७ जून रोजी पुणे महामार्गावरील रावल वाईन्सजवळ अलका साटोटे या हातगाडीवर शेंगदाणे-फुटाण्याची विक्री करीत. संशयित सागर सदावर्ते, किरण पाटील, रोहित जाधव व दोन अनोळखी संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून साटोटे यांना शिवीगाळ व धमकी देत त्यांच्या हातगाडीवरील शेंगदाणे, फुटाणे व साहित्याची नासाडी करुन हातगाडी उलटवली होती.
तसेच त्यांना दांड्याने मारहाण करुन गल्ल्यातील ७०० रुपये जबरीने काढून घेत लुट केली होती. याप्रकरणी गेल्या गुरुवारी (ता. ११) उपनगर पोलिस ठाण्यात संशयित टोळक्याविरोधात दरोड्यासह मारहाण व दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलिसांनी सागर सदावर्ते, रोहित जाधव यांना अटक केली होती. तर मुख्य संशयित किरण पाटील व साथीदार पसार होते.
दरम्यान, मुख्य संशयित किरण पाटील हा उपनगरच्या पंचशीलनगर येथे असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना मिळाली होती. गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी सापळा रचला. पाटीलला पोलिस आल्याची कुणकुण लागताच त्याने दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकाने पाठलाग करुन पाटीलच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.