नाशिक (प्रतिनिधी): एमडी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तिघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दहा ग्रॅम एमडी ड्रग्ज व विनापरवाना गावठी पिस्तूल, असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेत आणखी काही संशयित आरोपी असण्याची शक्यता आहे. याबाबत सखोल तपास केला जात असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंबड पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित गौरव पाटील (२५, रा. सप्तशृंगी चौक, सिडको), योगेश मोघे (३०, रा. पाथर्डी गाव), विजय कुमावत (रा. कडवेनगर) या तिघांना पोलिसांनी पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलाखाली अमली पदार्थ विक्रीच्या तयारीत असताना जाळ्यात घेतले. तिघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या पथकाने कारवाई केली.