अंबड पोलिसांनी हिसकावली विषाची बाटली
नाशिक (प्रतिनिधी): घरातील कौटुंबिक वादाला कंटाळून वैफल्यग्रस्त झालेल्या एका युवकाने सोमवारी (दि.१०) थेट अंबड पोलिस ठाण्यात येऊन विष सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.
दरम्यान कर्तव्यावर असलेल्या सतर्क पोलिसांनी संबंधित युवकाजवळील विषाची बाटली त्वरित त्याच्या हातातून हिसकावून घेतली. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मोरवाडी गावात राहणाऱ्या २५ वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, सोमवारी दुपारी अंबड पोलिस ठाण्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. यादरम्यान दुपारी ४ वाजेच्या सुमारास तरुण पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार या कक्षात येताच त्याने त्याच्याकडे असलेले काही तरी विषारी औषध सेवन करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी कक्षात उपस्थित असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान राखत युवकाच्या हातातील विषारी औषध असल्याची बाटली हिसकावून घेत त्याला ताब्यात घेतले.
युवकाने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत युवकाला गुन्हे शोध पथकाचे घनश्याम भोये, किरण गायकवाड यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर करीत आहे.