नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
मुंबई नाक्यावर कारवाई, प्रवासी फरार, कारचालकास अटक
नाशिक (प्रतिनिधी): पुणे येथून नाशिकला येण्यासाठी एका महिलेसह दोन प्रवाशांनी ऑनलाइन बुक केलेल्या कारचा चालक एकाच ठिकाणी कार घेऊन उभा असल्याचे दिसून आल्याने गस्तीवरील पोलिसांनी संशयावरून कारची झडती घेतली असता त्यात एका गोणीत सुमारे २० किलो गांजाचा साठा हाती लागला.
पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असले तरी कार बुक करून नाशकात आलेले महिला व तिचा साथीदार दोघेही फरार झाले आहेत. या दोघांचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना प्राथमिक चौकशीत कारचालकाचे किरण गोविंद धुमाळ (रा. पुणे) असे नाव निष्पन्न झाले आहे. कार बुक केलेल्या संशयित महिलेने कारचालकास हॉल्टींग चार्जचे आमिष दाखवत भारतनगर परिसरात कार थांबवून निघून गेली. त्याचवेळी पोलिसांनी कारची झडती घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला.
मुंबई नाका पोलिस ठाण्याचे अंमलदार विजय म्हैसधुणे, भास्कर सदगीर यांना भारतनगर चौफुलीवर एमएच १२ डब्ल्यूआर ५२६२ या क्रमांकाची कार सोमवारी (दि. ८) सकाळी उभी असल्याची माहिती मिळाली. गुन्हेशोध पथकाला याची माहिती दिल्यानंतर पथकाने कारची झडती घेतली.
कारमध्ये बॅगा आणि गोण्या आढळून आल्या. पोलिसानी झडती घेतली असता त्यामध्ये गांजासदृश अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी संशयित कारचालक घुमाळ यास ताब्यात घेतले. कार जप्त करीत ४ लाखांचा गांजाही जप्त केला. पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
संशयित महिला पसार: पोलिस तपासात असे समोर आले की, संशयित पूजा संजय मिसाळ नामक महिलेने ऑनलाइन कार बुक केली होती. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ते भारतनगर चौफुलीवर पोहोचले. त्यावेळी संशयित महिला व तिच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने कारचालक किरण यास हॉल्टिंग चार्ज देण्याचे आमिष दाखवूविले. एक व्यक्ती गोणी घेण्यासाठी येईल त्यांना देण्याचे सांगितले होते. दरम्यान संशयित महिला व तिचा साथीदार फरार झाला असून नेमकी कोणासाठी हा गांजा आणला होता, तो कोण घेणार होता? पोलिस त्यांचा शोध घेत आहे.