नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रेल्वेसह शासकीय विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चौघा बेरोजगारांकडून पैसे उकळले. त्यानंतर संशयितांनी चौघांना रेल्वेसह शासकीय विभागातील नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांची तब्बल १९ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चौघे संशयितांविरोधात म्हसरुळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास उत्तम चव्हाण (रा. बोरगड), श्रीकांत बापू आहिरे (रा ठेंगोडा, ता. सटाणा), सोमनाथ कृष्णा पवार (रा. लोणारे, ता. सटाणा), वसंत रमेश खांडवी ( रा. मेघराज बेकरीमागे, पेठरोड) अशी संशयितांची नावे आहेत. भूषण विलास खंबाईत (रा. निरगुडे, ता. पेठ) या युवकाच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०१८ मध्ये संशयितांनी भूषण यांना रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांनी भूषण याच्याकडून पैसे घेतले होते.
त्याचप्रमाणे, अर्जून सीताराम बागुल (रा. उज्ज्वलनगर, बोरगड), योगेश अंबादास नाठे (रा. तिरडे कोपर्ली, ता. पेठ), जितेंद्र भास्कर जाधव (रा. पेठ) यांनाही संशयितांनी रेल्वे व शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही पैसे घेतले. मात्र संशयितांनी या चौघांना बनावट नियुक्तीपत्र देत त्यांची फसवणूक केली. संशयितांनी चौघांकडून १८ लाख ८२ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे हे तपास करीत आहेत. (म्हसरूळ पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १७६/२०२४)