नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पीडितेला बोलायचे म्हणून रिक्षाजवळ घेऊन आल्यानंतर संशयिताने तिला चावा घेत रिक्षात बसवून बळजबरीने अपहरण केले. त्यानंतर तिला रेल्वे रुळावर नेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने उभे केले. यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी तिला वाचविले. याप्रकरणी संशयिताविरोधात अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज राजेंद्र गांगुर्डे (२६, रा. हाडोळा, देवळाली कॅम्प) असे संशयित युवकाचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. १) दुपारी साडेबाराच्या सुमारास संशयित हा फिटनेट ऑफिससमोर पीडितेला भेटण्यासाठी आला असता, त्यावेळी तिने त्यास समजावून बाहेर काढून दिले.
त्यानंतर पुन्हा आला आणि पाच मिनिटे बोलायचे म्हणून तिला रिक्षाजवळ घेऊन गेला. त्यावेळी संशयिताने तिच्या हनवटीला चावा घेत तिला बळजबरीने तोंड दाबून रिक्षात बसविले आणि तिचे अपहरण केले. त्यानंतर तो रिक्षा खर्जुळ मळयाकडे घेऊन गेला.
तेथे पीडितेला ओढत -ओढत रेल्वे रुळाकडे घेऊन गेला आणि रेल्वे रुळावर उभे करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडितेने आरडा ओरडा केल्याने लोकांनी तिला वाचविले. तर संशयिताने तिच्याकडील मोबाईल फोन हिसकावून ते तिच्या आईला फोन करून, तुझ्या मुलीला रेल्वेखाली ढकलून देतो असे बोलून फोन बंद केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक एस.ए. चव्हाण हे तपास करीत आहेत. (देवळाली कॅम्प पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ८०/२०२४)