नाशिक (प्रतिनिधी): भागीदारीमध्ये फसवणुकीच्या घटना शहरात मागील काही दिवसांपासून सुरूच आहेत. बदलापूरच्या एका दाम्पत्यासह मुलाने पाटील लेनमध्ये राहणाऱ्या फिर्यादीला सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संजय शांताराम सांगळे (५५, रा. पाटील लेन-१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित संजीव शंकर आव्हाड, मीना संजीव आव्हाड आणि कार्तिक संजीव आव्हाड (रा. सर्व बदलापूर) यांनी सांगळे यांना खाणकामाच्या व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवत संगनमताने अडीच कोटी रुपये घेतले. तसेच २०२२साली बांधकाम व्यवसायासाठी त्यांना लागणारी दोन जेसीबी यंत्रे, दोन पोकलेन यंत्रे, चार मालवाहू ट्रक, स्टोन क्रशरचे संपूर्ण युनिटचा वापर करत वाहने व साहित्य परत न करता संशयितांनी अडीच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात सांगळे यांनी धाव घेत तक्रार नोंदविली. यानुसार संशयित आव्हाड पती-पत्नीसह मुलाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक जानकर हे करीत आहेत. (सरकारवाडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३३/२०२५)