नाशिक (प्रतिनिधी): सिडको जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवून एका चालकाची गॅरेज ७७ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी खासगी सावकार संशयित वैभव देवरे व त्याची पत्नी संशयित सोनल देवरे आणि शालक संशयित निखिल पवार यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरेवर अंबड पोलिस ठाण्यात यापूर्वीही चार ते पाच गुन्हे दाखल आहेत.
अंबड पोलिस स्टेशन फिर्यादी सदाशिव पवार (५८, रा. फडोळ मळा, अंबड) यांचे गॅरेज व क्रेन सर्व्हिसचा व्यवसाय आहे. त्यांना व्यवसायासाठी जमीन खरेदी करावयाची होती, यामुळे त्यांनी सप्टेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरोपी संशयित गोविंद पांडुरंग ससाणे (रा. कामटवाडे), वैभव देवरे, सोनल देवरे, निखिल पवार यांनी संगनमताने हिरावाडी येथील एका भूखंडाची मूळ बनावट कागदपत्रे तयार करून पवार यांना ती खरी असल्याचे भासविले, तसेच ससाणे याने सारूळ येथील एका जमिनीचा दुसऱ्या लोकांसोबत व्यवहार झालेला असतानाही त्याचा पुन्हा व्यवहार करत सोनवणे यांची फसवणूक केली.
सारूळ व हिरावाडी येथील जमिनींच्या व्यवहारापोटी या संशयितांनी त्यांच्याकडून ६३.४९ लाख रुपये वसूल केले. देवरे व पवार यांनी फिर्यादीकडून ३५ लाख रुपये बळजबरीने खंडणी वसूल केली. पवार यांनी २० लाख रुपयांची देवरे यांच्याकडे मागणी केली असता त्याने नकार देत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
फोनवरून दिली विनयभंगाच्या तक्रारीची धमकी:
फिर्यादी पवार यांच्याविरुद्ध कट रचून तिघांनी फसवणूक केली, तसेच सोनल देवरे हिने फोनवरून त्यांना धमकावत विनयभंगाची तक्रार तुमच्याविरुद्ध दाखल करील, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.