नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन मनपा कर्मचाऱ्याचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास गोदाघाट परिसरात घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी सनी जॉन हे काल रात्री १०:४५ च्या सुमारास आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून जात होते. समोरून येणाऱ्या एका दुचाकीला त्यांचा धक्का लागला. त्यावेळी सनीचे मित्र व दुचाकीवरील इसम यांच्यात बाचाबाची झाली. पुढे पानटपरीवर एकत्र आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाले. काही वेळाने सनी जॉन हे गोदाघाटावर मित्रांसोबत बसले होते.
त्यावेळी एका टोळक्याने त्या सर्वांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एकाने त्याच्याकडील धारदार शस्त्राने सनीच्या पोटात व मांडीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या सनीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र घाव वर्मी लागल्याने व रक्तस्त्राव जास्त झाल्याने सनीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी, सरकारवाडा व भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला.
त्यानंतर पोलिसांना तांत्रिक व मानवी कौशल्याच्या आधारे संशयित आरोपी मयूर राजेश पठाडे व रोहित उर्फ दादू सुधाकर पेखळे हे कोणार्कनगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर पोलीस पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी सनीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे करीत आहेत.