नाशिक (प्रतिनिधी): गांजा तस्करी प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांवर भंडारा पोलिस ठाणे (जि. भंडारा) येथे गुन्हा दाखल झालेला होता. पोलिसांनी २५ लाख ६ हजार ५०० रुपये किंमतीचा १६७ किलो गांजा जप्त केलेला होता. यानंतर दोघे परदेशात पसार होण्याच्या बेतात असतांना नाशिक पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक करत भंडारा पोलिसांकडे ताबा दिला आहे.
तुषार संतोष भोसले (वय २६, रा. गोपालनगर, अमृतधाम, पंचवटी) आणि सुरज रामु शिंदे (वय २७, रा.ध्रुवनगर, गंगापूररोड) असे अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी (ता.६) अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस अंमळदार बाळासाहेब नांद्रे यांना संशयितांबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. भंडारा पोलिस ठाण्यात या दोघांवर गांजा तस्करीचा गुन्हा दाखल झाल्याने ते नाशिकहून पसार होण्याच्या बेतात होते. त्यामुळे शिताफीतीने दोघा संशयितांना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेतले.
तसेच त्याच्या जवळील पासपोर्ट आणि एक्सयुव्ही ७०० ही चारचाकी वाहनदेखील हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयितांना भंडारा पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, हवालदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, बाळासाहेब नांद्रे आदींनी केली.
दोघे संशयित सराईत:
ताब्यात घेतलेले दोघे संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या दोघांवर यापूर्वी २०२२ मध्ये निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.