वडाळा गावात ६ वर्षांपूर्वी घडली होती घटना
नाशिक (प्रतिनिधी): चांगला कामधंदा कर, व्यवस्थित रहा असे वारंवार वयोवृद्ध आई आपल्या पोटच्या मुलाला सांगत होती, याचाच राग धरून आरोपी अलाउद्दीन कमरुद्दीन शेख (३०, रा. गणेशनगर, वडाळा) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दोन हजारांचा दंडाची शिक्षा सोमवारी (दि.१८) सुनावली. सत्र न्यायाधीश आर. एन. शिंदे यांनी अलाउद्दीनला दोषी धरले.
इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत वडाळा गावातील गणेशनगरमध्ये राहणाऱ्या रुख्साना कमरूद्दीन शेख (६८, रा. गणेशनगर) यांना त्यांचा मुलगा अलाउद्दीन याने गळा व तोंड, नाक दाबून निर्दयीपणे जन्मदात्री आईला ठार मारले होते. यानंतर खुनाचा गुन्हा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मयत झालेल्या आईच्या अंगावरील कपडे काढून तिच्या ओढणीने तोंड आवळून दोरीने हातपाय बांधून ब्लॅकेटमध्ये गुंडाळून ठेवले होते.
👉 या खटल्यावर सोमवारी अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी अभियोक्ता अपर्णा पाटील, सहायक सरकारी अभियोक्ता रेवती कोतवाल यांनी बाजू मांडत युक्तिवाद केला.
👉 खुनाच्या गुन्ह्यात न्यायाधीश शिंदे यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंच यांची साक्ष व तपासी अधिकारी मोहिते यांनी सादर केलेल्या पुरा- व्यांअधारे आरोपी अलाउद्दीन यास त्याच्या आईच्या खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरत जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एन. एन. मोहिते यांनी या गुन्ह्याचा चिकाटीने तपास करत छडा लावला. सबळ पुरावे गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
गुन्हा सिद्ध होण्यासाठी तपासी अंमलदार मोहिते, कोर्ट अंमलदार सुधाकर गायकवाड यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी कौतुक केले आहे.