नाशिक (प्रतिनिधी): घरात कुणी नसल्याची संधी साधत कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सिडकोत घडली आहे.
शाहरुख खलील मनियार यांनी याबाबत अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शाहरुख मनियार (राहणार: साई बाबा नगर, सिडको) हे दि. २ जुलै २०२३ रोजी दरवाजाला कडी कुलूप लावून एका कार्यक्रमानिमित्त जव्हार येथे गेले होते. दि. ३ जुलै २०२३ रोजी त्यांचा चुलत भाऊ तन्वीर हसन पटेल याने त्यांना फोन करून सांगितले की त्यांच्या घराचं कुलूप तोडलेलं दिसत आहे. त्यामुळे शाहरुख हे तात्काळ जव्हारहुन नाशिकला परतले.
त्यांनी घरात जाऊन पहिले असता, त्यांच्या लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, १ ग्रॅम सोन्याचे मणी, १२ हजार रुपये रोख असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल कुणीतरी लंपास केल्याचे लक्षात आले.
याबाबत त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत..