नाशिक। दि. ३० ऑगस्ट २०२५: नांदूर नाक्यावर गेल्या आठवड्यात कट दुचाकीचा लागल्याने गाडी हळू चालव असे सांगितल्याचा राग आल्याने टोळक्याने दोघा युवकांना मारहाण करून शस्त्राने वार केले होते. प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या युवकाचा शुक्रवारी (दि. २९) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नांदुर नाका परिसरासह जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला. राहुलच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरु ठेवले.
रात्री उशीरा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आंदोलक नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरी नातेवाईकांनी राहुलचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. या घटनेप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करावी तो पर्यंत आम्ही राहुलचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा राहुलच्या नातेवाईकांनी घेतला. दरम्यानच्या काळात दुपारी संतप्त नातवाईकांनी आपला मोर्चा पोलिस आयुक्त कार्यालयात नेला. भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह जणांवर आडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली.
प्राणघातक हल्ल्यात मेघराज जोजारे, गणेश निमसे, रोशन जगताप, अक्षय पगार, सुधीर निमसे, पवन निमसे, सुमित हांडोरे या संशयितांना हल्ल्यानंतर अटक करण्यात आली होती. आता प्राणघातक हल्ल्यात जखमी युवकाचा मृत्यू झाल्याने खुनाचे वाढीव कलम लागले आहेत.
निमसे यांचा जामीन फेटाळला:
ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्धव निमसे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता, मात्र शुक्रवारी यावर अंतिम सुनावणी झाली. पोलिसांनी जखमी राहुलचा मृत्यू झाल्याची बाजू न्यायालयात मांडली. त्यानंतर न्यायालयाने निमसे यांचा जामीन फेटाळून लावला. निमसे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहे.