नाशिक। दि. २९ सप्टेंबर २०२५: ‘इथे लघुशंका करू नकोस’ असे म्हंटल्याचा राग येऊन एका सराईताने उड्डाणपुलाखाली वास्तव्य करणाऱ्या मजुराचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
वडाळा नाका परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ केवळ लघुशंका करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका 35 वर्षीय मजुराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंडू लक्ष्मण गांगुर्डे असे मयत मजुराचे नाव असून, तो आपल्या पत्नीसोबत पुलाखाली वास्तव्यास होता.
ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. बंडू गांगुर्डे वास्तव्य करत असलेल्या खांबाजवळ संशयित आरोपी जयेश दीपक रायबहादुर हा लघुशंका करण्यासाठी आला असता बंडू गांगुर्डेने आक्षेप घेतला. त्याला “येथे लघुशंका करू नकोस,” असे म्हणताच, संतप्त झालेल्या जयेशने त्याच्या जवळच्या धारदार चाकूने बंडूवर हल्ला चढवला. छाती व पोटावर वार करत त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर जयेश घटनास्थळावरून फरार झाला.
हल्ल्यानंतर गांगुर्डे याच्या पत्नीने त्याच्यावर किरकोळ प्रथमोपचार केले व चादर पांघरण्यास देऊन झोपवून दिले. सकाळी बंडूने पत्नीला पाणी मागितले त्यावेळी त्याच्या जखमांमधून रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात आले. पत्नीने इतर लोकांच्या मदतीने बंडू यास रिक्षात टाकून सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
बंडू गांगुर्डे याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार जयेश दीपक रायबहादूर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत जयेशवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत सहा गंभीर गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुलाखाली राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस उप-निरीक्षक अतुल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. ( मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३१६/२०२५)
![]()

