नाशिक (प्रतिनिधी): गोदाकाठी दर बुधवारी भरणाऱ्या बाजारात वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यास गेलेल्या १९ वर्षीय तरुणावर चार जणांच्या टोळक्याने चाकूने वार करून खून केला. बुधवारी (दि. २८) भाजी पटांगण परिसरात सायंकाळी ७ ते पावणे आठ वाजेदरम्यान ही घटना घडली. रुग्णालयात रात्री ११ वाजेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. नंदलाल उर्फ सूरज जगत दास (वय १९, रा. सीतागुंफा, पंचवटी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सूरज सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यासाठी गेला होता. वडील भाजी खरेदी करत असताना सूरज गाडगे महाराज पुलाखाली सुलभ शौचालयाजवळ उभा होता. तो एकटा उभा असताना त्याच्याजवळ चार मुले आली. त्यांनी सूरजकडे पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी सूरजला मारायला सुरुवात केली. त्याचवेळी सूरजच्या पोटात त्यांनी डाव्या बाजूला चाकू खुपसला. गंभीर जखमी अवस्थेत तो खाली कोसळला.
नागरिकांनी आणि वडिलांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २६१/२०२५) पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करत आहेत.
![]()

