नाशिक (प्रतिनिधी): पाठलाग करत लग्नाकरिता प्रवृत्त करण्यासाठी दबाव टाकून दमबाजी करण्याच्या प्रकाराला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने शुक्रवारी (दि. २३) विष प्राशन केले होते. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी पॉक्सो व भारतीय न्याय संहिता कलम १०७नुसार दहा संशयितांविरुद्ध मंगळवारी (दि. २७) गुन्हा दाखल केला आहे.
एका अल्पवयीन मुलीचा संशयित कलाम मन्सुरी (२२) हा पाठलाग करून तिने त्याच्याशी लग्न करावे, यासाठी दबाव टाकत होता. तिचा तो २०२२ सालापासून पाठलाग करत दम देत होता. मन्सुरी याला घरातील महिला नातेवाईकसुद्धा मदत करत होत्या. तसेच अन्य काही जणांनीसुद्धा
तिच्यावर मन्सुरीसोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते, असे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलीने शुक्रवारी राहत्या घरात काहीतरी विष प्राशन केले. त्यानंतर तिला त्वरित जवळच्या दवाखान्यात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. व पीडितेच्या आईने मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांनी संशयित मन्सूरी याच्यासह त्याची आई, आजोबा, मावशी आणि चार पुरुष अशा एकूण आठ जणांविरुद्ध अल्पवयीन मुलीला आत्महत्येसाठी चिथावणी देणे, छुपा पाठलाग करणे बालकांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी, विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४४९/२०२४)
शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ ठेवला राखून:
संशयित हे नेहमी पीडितेला ‘तू जर मन्सुरीबरोबर लग्न केले नाहीस तर आम्ही तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही,’ असे म्हणून दम देत होते. या सर्वांनी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला म्हणून तिने कंटाळून विषारी औषधाचे सेवन करून शुक्रवारी आत्महत्या केली, असा आरोप पीडितेच्या आईने फिर्यादीत केला आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे.