नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कारडा कन्स्ट्रक्शनचे मनोहर कारडा यांच्या आत्महत्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात संशयित अशोक कटारिया यांच्यासह ग्यान खत्री, कुलजितसिंग जोहर, प्रकाश चावला, आशुतोष राठोड, सनी सलुजा यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १५८/ २०२४).
भारती कारडा यांनी दिलेली तक्रार व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईनाका पोलिस ठाण्यात नरेश कारडा, मनोहर कारडा, देवेश कारडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नरेश कारडा यांना अटक झाल्यानंतर मनोहर कारडा यांनी २ नोव्हेंबर रोजी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली होती.
त्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर घराची साफसफाई करत असताना दोन डायऱ्या मिळाल्या. या डायऱ्यांमध्ये त्यांना धमक्या देऊन बेकायदेशीर रकमेची मागणी करण्यात येत होती, पैसे दिले नाही तर सर्व कुटुंबास तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती, असे नमूद केले होते. या दोन्ही डायऱ्या भारती कारडा यांनी पोलिसांत दिल्या होत्या.
या डायऱ्यांतील हस्ताक्षराची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी वरील संशयितांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच सावकारी अधिनियम कलम ३९, ४५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपस सहायक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर करत आहेत.