नाशिक। दि. २७ मे २०२५: शहर व परिसरात एका परप्रांतीय युवकाचा अज्ञातांनी मारहाण करीत खून केल्याची गंभीर घटना सोमवारी (दि.२६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सातपूर शिवाजीनगरच्या पाझर तलावाजवळ घडली. नसीम अकबर शहा (वय १९, रा. शिवाजीनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. हल्लेखोरांचा गंगापूर पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेतला जात होता.
शिवाजीनगर पाझर तलावाकडे फाशीच्या डोंगरापासून जाणाऱ्या रस्त्यावर नसीम याला दोघा संशयितांनी अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्याला ढकलून दिल्याने तो खाली रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने जागीच बेशुद्ध झाला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी धाव घेतली.
रुग्णवाहिकेतून नसीम यास सिव्हीलला पाठविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता एका सीसीटीव्हीत दोघे संशयित दिसल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२९/२०२५)