नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): यवतमाळ अरणी येथील सहलीनिमित्त नाशिक शहरात आलेल्या वीस विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि दोन पाकीट, असा १ लाख ६३ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
या प्रकाराबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ अरणी येथील नारायण लीला इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक तसेच विद्यार्थी असे ९५ जण सहलीसाठी शहरातील धार्मिकसह पर्यटन स्थळास भेट देण्यासाठी सोमवारी (ता. २५) शहरात आले.
सर्व गाडगे महाराज धर्मशाळा येथे मोठा हॉल घेऊन मुक्कामी थांबले. त्यातील वीस विद्यार्थ्यांनी हॉलमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी लावले. त्यांना झोप लागल्याने हॉलचे शटर अर्धे उघडेच राहिले.
याची संधी साधत चोरट्याने प्रवेश करत सर्व २० मोबाईल आणि दोन पैशाचे पाकीट असा १ लाख ६३ हजारांचा ऐवज चोरून पळ काढला. मंगळवारी (ता.२६) सकाळी विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रकार शिक्षकांना सांगितला.
त्यांनी भद्रकाली पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळास भेट देत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. शिक्षक प्रथम मनवर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. एकच वेळी वीस मोबाईल गेल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.