नाशिक (प्रतिनिधी): पत्ता विचारण्याचा बहाणा करुन अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या 39 वर्षीय संशयितास गुन्हे शाखेच्या युनिट एकने गजाआड केले आहे. अटक केलेला संशयित फूड डिलिव्हरी बॉय असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे २४ तासांत त्याला पकडण्यात आले आहे.
फारूख मोहंमद पठाण (वय-३९, रा. श्रमिक हौसिंग सोसायटी, राजीवनगर, नवीन सिडको) असे संशयित नराधमाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घटेनेतील पीडिताही (दि.२३) रोजी रात्री सव्वानऊ वाजता पंचवटीतील लामखेडे मळा परिसरातून घरी जात होती. त्याचवेळी मोपडवरुन आलेल्या संशयिताने तिच्याजवळ मोपेड थांबवून पत्ता विचारण्याचा बहाणा केला. तसेच तिला जवळ ओढून घेतले, यानंतर तो पळून गेला. हा प्रकार एका महिलेच्या लक्षात आला. तिने आरडाओरडा केल्यानंतर संशयित पळून गेला.
घटनेनंतर पंचवटीत अल्पवयीन पीडितेने फिर्याद दिल्याने भा. न्या. सं. कलम ७४ आणि पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल झाला. संवेदनशील गुन्हा असल्याने तत्काळ तपास सुरु झाला. त्यात पथकाने सीसीटीव्ही तपासानुसार संशयिताची ओळख पटविली. युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेने सहायक निरीक्षक हेमंत तोडकर व पथकाने नवीन सिडको परिसरातून पठाण यास ताब्यात घेतले. त्याचा ताबा पंचवटी पोलिसांकडे दिला आहे. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४७१/२०२४)