नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सातपूर येथे दोघा भावांनी भागीदारीतून वाईन शॉप सुरू केले. मात्र यातील एकाने मद्याच्या विक्रीतून येणारी रक्कम भागीदारीतील खात्यावर न घेता, स्वत:च्या फायद्यासाठी वैयक्तिक बँक खात्यावर जमा केली. त्यासाठी दुकानात स्वत:च्या बँक खात्याचा क्युआर कोडचाही वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यातून सुमारे ६८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकूळ नामदेव निगळ (५५, रा. निगळ गल्ली, सातपूर गाव) असे संशयिताचे नाव आहे. जगन्नाथ नामदेव निगळ (६९, रा. निगळ गल्ली, सातपूर गाव) यांच्या फिर्यादीनुसार, दोघा भावांनी हेवर्डस् ५००० या वाईन शॉपसाठी परवाना घेऊन ५०-५० टक्के भागीदारीमध्ये सातपूर गावात वाईन शॉप सुरू केले. यासाठी जगन्नाथ निगळ यांनी त्यांच्या निगळ कृषी सेवा केंद्र या संस्थेच्या नावावर कर्ज काढले.
मात्र, संशयित गोकूळ यांनी २०१४ ते जुलै २०२४ या दरम्यान, दुकानात येणारी रक्कम भागीदारीत असलेल्या बँक खात्यावर टाकली नाही. तर उलट स्वत:च्या फायद्यासाठी त्या रकमा स्वत:च्या बँक खात्यावर जमा केल्या. त्याचप्रमाणे, वाईन शॉपमध्येही ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी क्युआर कोड ठेवला.
परंतु तो क्युआर कोडही संशयित गोकुळ यांनी स्वत:च्या वैयक्तिक बँकेचा ठेवला होता. त्यामुळे ऑनलाईन व्यवहाराच्या रकमाही त्यांच्याच खात्यात जमा झाल्या आहेत. यातून भागीदार भाऊ जगन्नाथ निगळ यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पाटील हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. (सातपूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १८३/२०२४)