नाशिक। दि. २५ जून २०२५: घटस्फोटानंतर वैफल्यग्रस्त होऊन अपघातात जखमी झाल्यानंतर आपल्या सहा वर्षीय लेकीच्या भविष्याची चिंता सतत सतावत असल्याने शहर पोलिस दलातील अंमलदाराने लेकीला गळफास देत स्वतःही गळफास घेतला.
पत्नीशी एक वर्षापूर्वी फारकत झाल्यानंतर संबंधित पोलिस आपल्या आईच्या घरीच राहत होता. नव्याने घेतलेला आपला फ्लॅट मुलीला दाखवायला नेतो असे सांगून पोलिसाने तेथेच दोघांचेही आयुष्य संपवल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
जेलरोड येथील मॉडेल कॉलनीत मंगळवारी (दि. २४) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. स्वप्नील दीपक गायकवाड (३५) असे या अंमलदाराचे नाव असून भैरवी (६) असे त्यांच्या मुलीचे नाव होते. उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत स्वप्नील यांचा फारकतीनंतर जुलै २०२४ मध्ये गंभीर अपघात झाला होता. त्यांच्या डोक्यास व पायास गंभीर मार लागल्याने दोन महिने ते उपचार घेत होते. त्यामुळे त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हते. त्यानंतर वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
स्वप्नील यांचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र घरगुती कारणातून त्यांचे पत्नीसोबत वाद झाले होते. २०२४ मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. मुलीचा ताबा त्यांनी स्वतःकडे ठेवला होता. उपनगर पोलिस ठाण्यात ते ड्युटीला होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.