नाशिक। दि. २४ जून २०२५: धारदार शस्त्राने वार करून खून करीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह चामरलेणीच्या पायथ्याशी रविवारी टाकून देण्यात आला होता. या मृतदेहाची ओळख मंगळवारी (दि. २४) पटविण्यास पोलिसांना यश आले. कर्नाटकच्या बिदरमधील रहिवासी असलेला ट्रकचालक उमेश अंबिकार (३४) याचा अज्ञातांनी खून केल्याचे तपासांत निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
चामरलेणी डोंगराच्या पायथ्याशी कच्च्या रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना रविवारी (दि. २२) सकाळी आढळला होता. अंबिकार हा दिंडोरी येथे माल पोहोचविण्यासाठी जात होता. ट्रकचे इंधन संपल्यामुळे आरोग्य विद्यापीठाजवळ मागील तीन दिवसांपासून ट्रक उभा होता. मंगळवारी तो बेवारस स्थितीत आढळून आला. मृतदेह हा चालक अंबिकार याचा असल्याची ओळख पोलिसांनी नातेवाइकांशी संपर्क साधून छायाचित्रांवरून पटवून घेण्यास यश आले आहे.