नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सारडा सर्कल भागात गुटख्याची बेकायदा वाहतूक करणारा पानस्टॉल चालक पोलीसांच्या हाती लागला असून, त्याच्या घरझडतीत लाखोंचा पानमसाला व सुगंधी सुपारीचा साठा मिळून आला आहे. पोलीसांनी सुमारे १ लाख ४० हजाराचा गुटखा हस्तगत केला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
मोहम्मद माजीद सुफीयान खान (२० रा.मातृछाया बिल्डींग मदिनाचौक,सारडा सर्कल रोड ) असे संशयिताचे नाव आहे. खान हा पानटपरी चालक असून तो आपल्या दुकानात राजरोसपणे गुटख्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२३) पथकाने सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळय़ात अडकला.
चोरीछुपी विक्रीसाठी तो गुटख्याचे पुडे दुकानात घेवून जात असतांना मिळून आला. पोलीसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरात विविध कंपनीचा पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा असा सुमारे १ लाख ३९ हजार ५१६ मुद्देमाल मिळून आला. याबाबत युनिटचे कर्मचारी प्रविण वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.