नाशिक (प्रतिनिधी): अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सलो पॉइंटजवळ असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. तब्बल १८ लाख ७६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याने शहरातील एटीएमची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली. ही घटना गुरुवारी (दि. २२) उघडकीस आली असून, अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मयूर संजय महाजन (३०, रा. वृंदावन पार्क, पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली. ते आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम विभागाचे मॅनेजर असून, गुरुवारी सकाळी सफाई कामगाराने एटीएमचे दरवाजे तुटलेले असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना तत्काळ कळविले. तीन मशीनपैकी एका मशीनचे दरवाजे गॅस कटरने फोडल्याचे आढळून आले. या मशीनमधून १८.७६ लाखांची रोकड चोरी गेली. सर्व नोटा ५०० रुपयांच्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. व पुढील तपास सुरु आहे.