नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): खोटा बँकेचा चेक देऊन ६८ हजार रूपयांना व्यापा-याला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. इलेक्ट्रीक साहित्य खरेदी दोघांनी ही फसवणूक केली आहे. माल घेवून पसार झालेल्या भामट्यांशी संपर्क न झाल्याने व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश पवार व मनिलाल चव्हाण अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत रोहन सुधीर इंगळे (रा. गणेश चौक,सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. इंगळे यांचा इलेक्ट्रीक साहित्य विक्रीचा व्यवसाय असून खुटवडनगर येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळील समर्थ एम्पायर या इमारतीत शॉप आहे. गेल्या शुक्रवारी (दि.१७) रोजी संशयितांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. माल घेण्यासाठी एका इसमास पाठवित असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मालाच्या अर्ध्या रक्कमेचा धनादेश सदर इसमासोबत पाठवत असून उर्वरीत रक्कम स्वतः येवून अदा करू असे सांगितले. त्यामुळे इंगळे यांचा विश्वास बसला.
त्यानंतर अॅटोरिक्षातून आलेल्या व्यक्तीने धनादेश देवून माल खरेदी केला. चार दिवस उलटूनही माल घेवून गेलेले ग्राहक उर्वरीत रक्कम देण्यासाठी न आल्याने इंगळे यांनी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे त्यांनी बँकेत जावून धनादेश वटविण्यासाठी टाकला असता तो बनावट असल्याचे समोर आले. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच इंगळे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.