नाशिक (प्रतिनिधी): अंबड परिसरात दोन किलो गांजासह दोघा संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने सदरची कारवाई केली असून रिक्षा व २५ हजारांचा गांजा असा सुमारे दीडलाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदीप उर्फ बाळा राजाराम महाले (२४, रा. अंबडगाव), सुकदेव गंगाधर जाधव (३३, रा. जाधव संकुल, अंबड लिंकरोड) असे दोघा संशयितांची नावे आहे.
शहरातील अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवून धडक कारवाईचे आदेश आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी अंमलीविरोधी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांनी अंबड परिसरात अंमलीपदार्थ घेऊन संशयित येणार असल्याची खबर मिळाली होती.
पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे यांनी कारवाईबाबत सूचना केल्यानंतर सहायक निरीक्षक विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे, अंमलदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, अनिरुद्ध येवले, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अनिवाश फुलपगारे व अर्चना भड यांनी सापळा रचून संशयित महाले व जाधव या दोघांना रिक्षेतून गांजा वाहतूक करताना ताब्यात घेतले. रिक्षातून सुमारे २५ हजारांचा २ किलो ५३३ ग्रॅम गांजा आणि रिक्षा जप्त केली. संशयित महाले हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्याविरोधात अंमली पदार्थविरोधी गुन्हा दाखल आहे.